छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह हमालवाडा परिसरातील एका कंपनीत सापडला होता. हा खूनच असल्याचा उलगडा पोलिसांनी केला. चोरीच्या उद्देशाने कंपनीत शिरणार्या व्यक्तीला तेथील सुरक्षारक्षक व त्याच्या मित्रांनी केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. याबाबत सातारा पोलिसांनी शनिवारी (दि. २८) ४ जणांना अटक केली.
राहुल बाबूराव दुतोंडे (वय २४, रा. सातारा गाव), ऋषिकेश बबन वक्ते (वय २५, रा. दांडेकर बिल्डिंग, सातारा), चंद्रकांत भाऊसाहेब मारकळ (वय २१, रा. सातारा गाव), रोहित संतोष नगराळे (वय २०, रा. सातारा गाव) अशी आरोपींची नावे आहेत. घटनेतील मृताची अद्याप ओळख पटलेली नाही. पोलिसांच्या माहितीनुसार, १८ फेब्रुवारीला हमालवाडा येथील पाइप कंपनीत अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. मारहाणीने मृत्यू झाल्याने पोलिसांनी घातपाताच्या दिशेने तपास केला. गुप्त बातमीदाराच्या माहितीने पोलिस आरोपीपर्यंत पोहोचले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर जेव्हा दुसरा आरोपी पोलिसांच्या हाती लागला, तेव्हा त्याने सर्व उलगडा केला. यानंतर इतर आरोपींनाही अटक केली. आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.













